Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

Case Against Navneet Rana: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये रास्ता रोको केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच त्या शनिवारी अमरावतीत पोहोचल्या. रस्त्यावर स्टेज करून रात्री उशिरा लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावल्याची तक्रार त्याच्यावर करण्यात आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांच्या 14 समर्थकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा शनिवारी दिल्लीहून नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्थानिक मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'समोर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर 23 एप्रिल रोजी या जोडप्याला अटक करण्यात आली होती. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Sambhaji Raje: संभाजीराजेंचा राजकीय उदय पश्चिम महाराष्ट्रातील काहींसाठी धोक्याचा, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य)

मुंबईतील विशेष न्यायालयाने 4 मे रोजी या दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. अमरावतीच्या लोकसभेचे खासदार नवनीत राणा यांनी येथे पत्रकारांना सांगितले, “आम्ही हनुमान चालिसाचे पठण केले आणि आरती केली. राज्यावरील शनीची साडेसाती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करण्यासाठी आम्ही येथे पोहोचलो. बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आम्ही प्रार्थनाही केली."

राणा दाम्पत्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही रामनगर येथील याच मंदिरात हवन करून हनुमान चालीसाचे पठण केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महागाई नियंत्रणात येण्यासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले.