Mumbai Police | (Photo Credits: File Image)

मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या कार चोरी रॅकेटचा (Car Theft Racket) पर्दाफाश केला आहे. आरोपींनी बनावट आधार आणि पॅन कार्ड वापरून तब्बल 7.30 कोटी रुपयांच्या प्रीमियम कार खरेदी केल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्ज घेऊन गाड्या खरेदी केल्यानंतर, इंजिन आणि चेसिस नंबर बदलून त्या इतर राज्यात विकल्या गेल्या. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. अहवालानुसार, अशा चोऱ्यांसाठी आरोपींनी राज्याबाहेरील व्यापाऱ्यांचे जीएसटी क्रमांक वापरले. यानंतर, बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवण्यात आले.

सिबिल स्कोअर चांगला असलेल्या व्यावसायिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन गाड्या खरेदी केल्या. आरोपी कागदपत्रांवर त्या व्यावसायिकांचे फोटो लावायचे. त्यानंतर गाड्यांचे इंजिन क्रमांक आणि चेसीस क्रमांक बदलून इतर राज्यात विकण्यात आल्या. ही टोळी दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेशातील एजंटचा वापर करून त्या त्या राज्यातील रहिवाशांना कार विकत असे. अशा प्रकारे आरोपींनी बँका, व्यापारी आणि कार खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केली.

या टोळीकडून 7.3 कोटींच्या 16 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, स्कोडा, मर्सिडीजसह अनेक महागड्या वाहनांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या टोळीला जेरबंद केले. ते म्हणाले, टोळीतील सदस्य मुंबईच्या आसपासच्या भागात राहत होते. आरोपींनी एक घर भाड्याने घेऊन ठेवले होते, बँकेकडून पडताळणी करण्यासाठी या घराचा पत्ता दिला जात असे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेले आरोपी वेगवेगळ्या राज्यात कार चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचाही आरोप असल्याने याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. (हेही वाचा: Foreign Currency Smuggling In Pune: पुस्तकांमध्ये लपवले 400,100 डॉलर्स; पुणे कस्टम्सकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश)

अटक करण्यात आलेल्या चार आरोपींवर यापूर्वीचे गुन्हे नोंद आहेत. तीन आरोपी मुंबई आणि उपनगरातील आहेत, तर उर्वरित गुजरात, मध्य प्रदेश आणि काही दिल्लीतील असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 16 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या आणखी वाढणार आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या टोळीला जेरबंद केले. ते म्हणाले, टोळीतील सदस्य मुंबईच्या आसपासच्या भागात राहत होते.