बलात्कार (Rape) झाल्याची तक्रार करुन हे प्रकरण कोर्टापुढे जाताच असे काही झालेच नाही असे सांगणाऱ्या 27 वर्षीय महिलेला कोर्टानेच अद्दल घडवली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील महिलेला ही अद्दल घडली आहे. सदर महिलेने चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन (Police Station Amdapur) गाठत फिर्याद दिली होती. या फिर्यादीत तिने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. फिर्याद आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला. हे प्रकरण सुनावणीसाठी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर गेले असता महिलेने साक्ष फिरवत असे काही झालेच नसल्याचे सांगितले.
बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ई-फायलिंगद्वारे दाखल झालेल्या या प्रकरणावर निकाल देण्यात आला. फिर्यादी महिलेने आरोपीने आपल्यावर बलात्कार केला नसल्याचे म्हटले. फिर्यादी खोटे बोलत आहे किंवा साक्ष फिरवत आहे त्यामुळे कोर्टही भडकले. महिलेने आपल्या फिर्यादीत आरोप केला होता की, एकटी असताना पतिच्या मित्राने घरात प्रवेश करुन आपल्यावर बलात्कार केला. दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेले हे प्रकरण न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीसाठी आले असता महिलेने साक्ष फिरवली. असे काही घडलेच नसल्याचे महिलेने म्हटल्याने कथीत आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले. (हेही वाचा, लूकवरील टिप्पण्यांना लैंगिक टिप्पण्या मानल्या जाऊ शकत नाहीत, Patiala House Court चा नियम)
न्यायालयाने निर्णय देताना निरिक्षण नोंदवत म्हटले की, सदर फिर्यादीने (महिला) न्यायालयात जाणीवपूर्वक खोटी साक्ष दिल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे कोर्टाची दिशाभूल केल्याचा आणि कारणाशिवाय यंत्रणा कामाला लावल्याचा ठपका ठेवत फिर्यादी महिलेवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार स्वतंत्र कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात कोर्टामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांनी हे प्रकरण ई-फायलींच्या माध्यमातून दाखल केले होते. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे प्रकरण दाखल करण्यात आले होते. कोर्टाने फिर्यादी महिलेला आपले म्हणने मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, महिलेने कोणतीच बाजू मांडली नाही. त्यामुळे कोर्टाने शिक्षा सुनावत निकाल दिला.