समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. बुलढाण्यात झालेल्या या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर 8 प्रवाशी हे जखमी झाले आहेत. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देखील जाहीर केली आहे. साम टिव्हीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. (हेही वाचा - Buldhana Accident: बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू)
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधीत पोलीस अधिकाऱ्यांसोबत फोनरुन चर्चा केली. जखमींवर तातडीच्या उपचार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबधीत यंत्रणांना दिल्या. सध्या मृतांची ओळख पटवणे सुरू असून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर देखील त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जखमींवर राज्य सरकारच्या खर्चाने उपचार होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री कक्षाकडून देण्यात आली आहे.
Maharashtra CM Eknath Shinde announces an ex-gratia of Rs 5 lakhs to the next of kin of the deceased in the bus accident on Samruddhi Mahamarg expressway in Buldhana: CMO
— ANI (@ANI) July 1, 2023
मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही.