CM Uddhav Thackeray, Sushil Kumar Modi (PC - PTI)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या (Suicide) प्रकरण आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर बॉलिवूड माफियांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार मोदी म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस बिहारच्या जनतेला काँग्रेस काय तोंड दाखवणार, असंही सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलयं. (हेही वाचा - Maharashtra Health Minister Rajesh Tope's Mother Dies: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन)

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहारी नागरिकांना मोठा धक्का बसला. त्यामुळे सर्व बिहारमधील सर्व पक्षांकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना बिहार सरकारचीदेखील बाजू समजून घ्यावी, अशी विनंतीही सुशीलकुमार मोदी यांनी केली आहे.

यापूर्वीदेखील ठाकरे सरकारने बिहारच्या नागरिकांशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातही महाराष्ट्रातून बिहारला निघालेल्या मजुरांना ठाकरे सरकारकडून आडकाठी केली जात होती. त्यामुळे यावेळी सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात सरकार योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील, असंही सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे.