आयबीचा (Intelligence Bureau) माणूस असल्याचा दावा करणाऱ्या एका तोतयास अकोला येथील खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे हा तोतया आयबीचा माणूस असल्याचे सांगत एक व्यक्ती चारचाकी घेऊन शिवसेना आमदार विल्पव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्या घरात घुसला. त्याने मोठ्या आत्मविश्वासाने बाजोरिया यांच्या घरातील सोफ्यावर बैठक मारली आणि घरातील व्यक्तींकडे फर्माईश करण्यास सुरुवात केली. आपण आयबीचा माणूस असून, आपल्या घरातील सर्व वाहनांची कागदपत्रे दाखवा, असे फर्मानच या व्यक्तीने सोडले. बाजोरीया यांच्या नातवाशीही त्याचा वाद झाला. दरम्यान, घरातील लोकांना त्याचा संशय आल्याने त्यांनी आमदार बाजोरीयांना तशी कल्पना दिली. त्यानंतर बाजोरिया कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले.
बाजोरिया कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित आरोपीवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुर्तिजापूर रस्त्यावरील महाबीज कार्यालयाजवळ माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांचे निवासस्थान आहे. प्रतिक संजयकुमार गावंडे (वय ३२, राहणार लेडी हार्डिग काँर्टर्स, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. मानसिकदृष्ट्या खचल्याने त्याने हे कृत्य केल्याची प्राथमीक माहिती आहे. गुरुवारी (31 मार्च) रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास प्रतिक संजयकुमार गावंडे हा व्यक्ती एक चारचाकी कार (वाहन क्रमांक- MH 04 FU 0919) घेऊन घुसला. त्याने बाजोरिया यांच्या घराच्या पार्किंग परिसरात गाढी पार्क केली. त्यानंतर तो बाजोरिया यांच्या घरातील सोफ्यावर जाऊन बसला. त्याने घरातील गाड्यांची कागदपत्रे आणि चाव्या मागितल्या. (हेही वाचा, Pravin Darekar: प्रविण दरेकर यांना धक्का, बोगस मजुर प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दिलासा नाकारला)
संबंधित व्यक्तीने दमदाटी करुन बाजोरिया कुटुंबीयांकडून दोन गाड्यांच्या चाव्याही घेतल्या. परंतू, बाजोरिया कुटुंबीयांना या इसमाचा संशय आला. त्यांनी त्याच्याकडे ओळखपत्र मागितले. ओळखपत्र दाखविण्यास त्याने नकार दिला. त्याला नाव, गाव विचारले असता त्याने आपले नाव प्रतिक संजयकुमार गावंडे असे त्याने नाव सांगितले. त्याने घरात घुसण्याचाही प्रयत्न केला. त्याला कुटुंबीयांनी घराबाहेर जाण्यास सांगितले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी प्रतिक गावंडे याला ताब्यात घेतले. तसेच, प्राप्त तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भांदवि कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला.