KEM Hospital Reports | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) रुग्णाचे तपासणी अहवाल चक्क रद्दीला घातल्याचा आणि त्यावर कडी म्हणजे त्यापासून पेपर प्लेट्स (Paper Plates) बनविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकाराचा सर्वांनाच धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणले असून बीएमसी (BMC) प्रशासनाला धारेवर धरले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील या मुंबई महापालिका रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप केला आहे.

किशोरी पेडणेकर आक्रमक

शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही आगळीक करणाऱ्या अधिकाऱ्याची थेट हाकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. रुग्णांचे अहवाल विकण्याचे नेमके कारण काय? तसेच, सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हे अहवाल कोणाला सांगून विकले? असा थेट सवाल पेडणेकर यांनी केला आहे. मुंबई महापालिका रुग्णालयात त्यातही केईएममध्ये विवध आजारांचे रुग्ण येतात. या आजाराचे निदान करण्यासाठी अहवाल तयार केले जातात. त्या सर्व आजार आणि लक्षणांचा लेखाजोखा या रिपोर्टकार्ड्समध्ये असतो. असे असताना प्रशासनाने हे रिपोर्ट रद्दीत कसे घातले? असा सवाल उपस्थित होतो आहे. (हेही वाचा, BMC Staff Corruption Case: 58 वर्षीय बीएमसी कर्मचार्‍याविरूद्ध भ्रष्टाचार प्रकरणामध्ये 4 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा)

संबंधित अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची मागणी

किरोशी पेडणेकर यांनी सोशल मीडिया मंच एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये केईएमचा लोगो, नाव आणि रुग्णाची माहिती असलेल्या अनेक रिपोर्ट्स कार्डपासून पेपर प्लेट्स बनवल्याचे पाहायाला मिळते. व्हिडिओ शेअर करताना लिहीलेल्या पोस्टमध्ये पेडणेकर यांनी हे काय चाललंय? असा सवाल विचारत प्रशासन जागे व्हा…! एवढा अंधाधुदी कारभार करू नका, असे म्हटले आहे. दरम्यान, या वेळी पेडणेकर यांनी पालिका अधिकारी सुधाकर शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते पालिकेत आल्यापासून मुंबईची वाट लावली आहे. त्यांची हाकलपट्टी करायला हवी. वय उलटून गेले तरी ते पदावर बसले आहेत, त्यांना वारंवार मुदतवाढ मिळते. कोणाच्या आशीर्वादाते ते पदावर बसलेत सर्वांना माहिती आहे, असा संताप पेडणेकर यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, Hand Donation in Mumbai: KEM Hospital मध्ये पहिल्यांदाच हात दान; ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयदानामुळे 5 जणांना फायदा)

पालिकेचे अधिकारी सुधाकर शिंदे आल्यापासून मुंबईची वाट लावली आहे. आधी त्यांना हाकला. त्यांचं वय उलटून गेलं आहे. त्यांनाही वारंवार एक्स्टेनशन दिलं जात आहे. त्यांच्या मागे कोण आहे? कुणाच्या तरी आश्रयाने ते बसले आहेत. त्यांना आधी हद्दपार करा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

व्हिडिओ

दरम्यान, रुग्णांचे अहवाल रद्दीत विकून पैसे कमवायला पालिकेला भिक लागली आहे काय? असा सवाल विचारतानाच आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, असे पत्र पालिकेला देणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.