कोविड 19 (COVID 19) च्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेनेही (BMC) कंबर कसायला सुरूवात केली आहे. शहरात रूग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता पालिकेकडून नवी नियामवली जारी झाली आहे. बीएमसीच्या नव्या कोविड 19 नियमावलीनुसार, जर एका इमारतीमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनारूग्ण आढळल्यास आता ती इमारत सील केली जाईल. त्या इमारतीमधील रहिवाश्यांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील.
मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल (30 ऑगस्ट) पालिका अधिकार्यांना सील केलेल्या इमारतीच्या गेट वर पोलिसांना तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अवाजवी ये-जा रोखण्यास मदत होईल परिणामी कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यातही मदत होणार आहे. सध्याच्या सिविक प्रोटोकॉल नुसार, सोमवार पर्यंत मुंबईत 27 इमारती सिल झाल्या आहेत. (नक्की वाचा: कोविड-19 निर्बंध शिथिलीकरणानंतर मुंबईच्या Marine Drive वर नागरिकांची तुफान गर्दी (See Pics)).
चहल यांच्यासोबत वॉर्ड ऑफिसर्सच्या झालेल्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये काल हा निर्णय झाला आहे. यावेळी हॉस्पिटल डीन, सिविक पब्लिक हेल्थ विभागाचे अधिकारी आणि मुंबई पोलिस डेप्युटी कमिशनर देखील उपस्थित होते. सील केलेल्या इमारती मध्ये बाहेरून कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सार्या सेवा देखील रोखल्या जाणार आहेत. पालिकेचा हा निर्णय इमारती मध्ये राहणार्यांना जाचक आणि गैरसोयीचा वाटू शकतो पण नागरिकांनी संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा चहल यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई मध्ये 24 वॉर्ड मध्ये देखील बीएमसी आयुक्तांनी क्लिन अप मार्शल नियुक्त करण्याचे आदेश आहेत. त्यांच्याद्वारा मास्क न घालणार्यांना, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणार्यांना दंड ठोठावण्याचे आदेश आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा धोका पाहता चहल यांनी पालिकेच्या रूग्णालयांना आणि जम्बो ट्रीटमेंट सेंटर्सना देखील सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई मध्ये सध्या 18 वर्षावरील सुमारे 74% लोकं लसवंत आहेत उर्वरित 26% लोकांनाही लवकरात लवकर लस दिली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.