सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेतील कर्मचार्यांनाही (BMC Employees) 5 दिवसांचा आठवडा (Five Days Week) लागू करण्यात येणार आहे. शासनाने यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकावर स्वाक्षरी झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने जारी केलेल्या पत्रकानुसार, अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता शनिवार आणि रविवार या दिवशी पालिकेचे मुख्यालय आणि इतर प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना याअगोदर दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता अशाच अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र मध्ये Coronavirus ची लागण झालेले रूग्ण नाहीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन)
महाविकास आघाडी सरकारने मागील महिन्यात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसदर्भात 5 दिवसांचा आठवडा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर आता महापालिकेच्या कामगार विभागाने पालिका कर्मचाऱ्यांसाठीही 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज कामगार विभागाने यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. आता यावर केवळ पालिका आयुक्तांची स्वाक्षरी बाकी आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी होती. तसेच सध्या देशात राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे पालिका कर्मचाऱ्यांनी स्वागत केल आहे.