BMC Election 2022 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation) निवडणुकीस अद्याप बराच अवधी आहे. या निवडणुकात 2022 (BMC Election 2020) मध्ये होणार आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाने आतापसूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणूक 2022 चे रणशिंग फुंकले आहे. मात्र, कितीही लवकर आणि जोमाने कामाला लागले तरीही स्वबळावर सत्ता मिळवणे ही प्रचंड कठीण गोष्ट आहे, हे भाजप जाणून आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजप एका नव्या भिडूच्या शोधात आहे. सध्यास्थितीत राज ठाकरे यांचा मनसे हा पर्याय भाजपसाठी बऱ्याच प्रमाणात खुला आहे. त्यामुळे भाजप सध्या मनसेसोबत जवळीक करु पाहतो आहे. परंतू, मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत ही जवळीक युतीपर्यंत (MNS-BJP) पोहोचणार का? हा खरोखरच कुतूहलाचा विषय आहे.

मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे. परंतू, शिवसेना, भाजप वगळता मुंबईत म्हणावी तशी ताकद कोणत्याच पक्षाची दिसत नाही. त्यामुळे खरी लढाई ही शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होणार हे स्पष्ट आहे. सध्यास्थितीचा विचार करता महाविकासआगाडी म्हणून पाहिले तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष सोबत आहेत. मनसे सुरुवातीपासूनच 'एकला चलो रे' धोरण स्वीकारुन आहे. त्यामुळे भाजप एकाकी आहे.

राज्यातील विविध प्रश्नावरुन सध्या भाजप आणि मनसे आक्रमक आहेत. दोन्ही पक्षांचे मुद्दे एकच असले तरी आंदोलने मात्र वेगवेगळी आहेत. परंतू, मनसेने नुकत्याच केलेल्या वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजपने मनसेला पाठींबा दिला होता. काही काळापूर्वी मुंबई भाजप नेते आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप युती दिसणार का अशी चर्चा सुरु आहे. (हेही वाचा, BMC Election 2022: जयंत पाटील यांचे महत्त्वपूर्ण विधान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी होण्याची शक्यता)

दरम्यान, मधल्या काही काळात राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला पाहायला मिळाला. मनसेने आपला झेंडा बदलत तो पूर्णपणे भगवा केला. सुरुवातीला मनसेच्या झेंड्यात भगवा, हिरवा, निळा आणि पांढरा असे रंग होते. पण ही गोष्ट 2006 मधली. आता 2020 मध्ये मनसेने आपला झेंडा पूर्ण भगवा केला आहे. शिवसेनेचे हिंदूत्व आपल्याकडे वळवायचे असा त्यामगचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, शिवसेनेने मनसे हा सुपारी घेणारा पक्ष आहे. कोणत्या तरी इतर पक्षाची सुपारी घेतल्याशिवाय तो पक्ष चालू शकत नाही, अशी जहरी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी 'लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणत या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते भाजप अशी जोरदार टीका केली होती. आपल्या टीकेतून त्यांनी भजापला नागडे केल. आणि आता जर ते भाजपकडे जाणार असतील तर 'उगड्याजवळ नागडा गेला' असाच प्रकार असल्याचे पाहायला मिळेल, असेही परब यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिका निवडणूक 2017 मध्ये मनसेचे 7 नगरसेवक निवडूण आले होते. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष जवळपास समसमान होते. पण शिवसेनेने आपले बहुमत अधिक भक्कम करण्यासाठी मनसेचे 7 पैकी 6 नगरसेवक आपल्या बाजूने वळवले होते. यावर 'काही गोष्टी जाहीरपणे बोलायच्या नसतात. त्या मनात ठेवायच्या असतात' असे राज ठाकरे यांनी जाहीरपणे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या या कृत्याचे उट्टे मनसे आता महापालिका निवडणूक 2022 मध्ये काढणार का? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार का? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी बऱ्याच प्रमाणात नकारार्थी असले तरी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.