कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई च्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाकडून किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध किशोरी पेडणेकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Bombay High Court) गेल्या. न्यायमूर्ती नितीन जमादार यांनी याचिका निकाली काढत किशोरी पेडणेकरांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळात बीएमसी मध्ये बॉडी बॅग खरेदीमध्ये घोटाळा केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणि ईडी चौकशी देखील सुरू आहे. त्याबाबत चौकशीसाठी किशोरी पेडणेकर ईडी कार्यालयातही गेल्या आहे. या दरम्यान त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार होती.
लोकसभा निवडणूकांची घोषणा होताच ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाया सुरू झाल्या आहे. यापूर्वी खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरेंचे सचिव सूरज चव्हाण अटकेत आहेत. या प्रकरणात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर देखील ईडीच्या रडार वर आहेत. तर मध्य दक्षिण मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या मागे देखील चौकशींचा ससेमिरा सुरू आहे. अशात किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.