Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

BMC Committee Heads Elections 2020:  मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समिती (BMC Education Committee) अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये पुन्हा शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या संध्या दोशी (Sandhya Doshi)  यांनी भाजपा उमेदवारावर मात करत अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडे (Shiv Sena)  राखले आहे. दरम्यान या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पक्षाकडून संगिता हांडोरे यांनी मतदानापूर्वी आपला अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीचा धर्म पाळत या मतदानामध्ये कॉंग्रेस तटस्थ राहिली आणि शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

आज बीएमसीमध्ये शिक्षण समिती पाठोपाठ स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची देखील निवडणूक आहे. दुपारी 2 वाजता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीमध्ये शिवसेनेकडून यशवंत जाधव निवडणूकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्यासमोर भाजपाच्या मकरंद नार्वेकर यांचे आव्हान असेल. शिक्षण समितीच्या निवडणूकीप्रमाणेच आता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यास शिवसेनेकडे पुन्हा दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपद येणार आहे. तर यशवंत जाधव हे तिसर्‍यांदा स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होतील. BMC Committee Heads Elections 2020: मुंबई महानगर पालिकेत आज स्थायी, शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक.  

दरम्यान आज बीएमसीमध्ये मुख्य विरोधक कॉंग्रेस पक्ष भाजपामदत करून शिवसेनेला धक्का देणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र राज्याप्रमाणेच कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला आहे. आयत्या वेळेस अर्ज मागे घेऊन त्यांनी तटस्थ राहणं पसंत केले आहे.

स्थायी समितीमध्ये शिवसेना 11, भाजपा 10, कॉंग्रेस 3, एनसीपी आणि समाजवादी पक्ष प्रत्येकी 1 असे संख्याबळ आहे. सोबतच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास त्याची स्थायी समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून निवड होते. त्यामुळे हे गणित जुळून आल्यास शिवसेनेचं बीएमसीमधील वर्चस्व टिकून राहू शकतं.