मुंबईमध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या बीएमसीमधील (Brihanmumbai Municipal Corporation) स्थायी (BMC Standing Committee) आणि शिक्षण समिती अध्यक्ष ( BMC Education Committee) पदाची निवडणूक आज( 5 ऑक्टोबर) रंगणार आहे. दरम्यान शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या मुंबई महानगरपालिकेतील या निवडणूकीमध्ये शिवसेना, भाजपा आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षांनी निवडणूकीच्या रिंगणात उडी मारली आहे. राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी ची महाविकास आघाडी असली तरीही बीएमसीच्या आजच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस आणि भाजपा एकत्र येत शिवसेनेला धक्का देणार का? अशा चर्चादेखील रंगत आहेत.
आज दुपारी 11 वाजता शिक्षण समिती तर दुपारी 2 वाजता स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. निवडणूकीच्या 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेण्यास परवानगी असल्याने आयत्यावेळेस बीएमसीमध्ये विरोधक म्हणून ओळख असलेला कॉंग्रेस शिवसेनेला भाजपा सोबत धक्का देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान स्थायी समितीमध्ये शिवसेना 11, भाजपा 10, कॉंग्रेस 3, एनसीपी आणि समाजवादी पक्ष प्रत्येकी 1 असे संख्याबळ आहे. सोबतच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास त्याची स्थायी समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून निवड होते. त्यामुळे हे गणित जुळून आल्यास शिवसेनेचं बीएमसीमधील वर्चस्व टिकून राहू शकतं.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेने यशवंत जाधव, भाजपाने मकरंद नार्वेकर, तर कॉंग्रेसने आसिफ झकेरिया यांना उमेदवारी दिली आहे. तर शिक्षण समितीमध्ये शिवसेनेने संध्या दोषी, भाजपाने सुरेखा पाटील, कॉंग्रेसने संगिता हांडोरे यांना उमेदवारी दिली आहे.