मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वीकारला पदभार; सर्वप्रथम केले 'हे' काम!
BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांची बदली करून त्याजागी इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चहल यांंनी काल रात्रीच काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारला. बीएमसी मुख्य आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारताच चहल यांंनी रात्री उशिरा चारही अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन कोरोना साथीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आज मुंबईतील नायर रुग्णालयाला (Nair Hospital) भेट दिली. मुंबईवर असणाऱ्या कोरोना संकट काळात कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चहल यांनी प्रोत्साहन देत रुग्णालयातील सर्व सेवा सुविधांची पाहणी केली. Coranavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे, पुणे शहरांत कोरोनाचा वाढता विळखा; पहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

इकबाल चहल यांनी यापुर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम केले आहे. मुंंबई मधील कोरोनाचा प्रसार पाहता याचा सर्वात मोठा फटका हा धारावीला बसल्याचे दिसुन येते अशावेळी चहल यांंच्या धारावी मधील कामाच्या अनुभवाचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. मुंंबई महानगर पालिका क्षेत्रात सद्य घडीला कोरोनाचे 12,142 संक्रमित रुग्ण आढळले आहेत, ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचे मोठे काम आता चहल यांच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. चहल यांच्या सोबतच ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैसवाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नवनियुक्ती करण्यात आली आहे.

पहा ट्विट

दरम्यान, पूर्व आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई मधील कोरोना विषाणूचा संसर्ग प्रकरण आटोक्यात आणण्यामध्ये अपयश आल्याने ही कारवाई केल्याचे म्हंटले जात आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. मे 2019 रोजी परदेशी यांनी BMC आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला होता.