BMC Budget 2022: मुंबई महापालिका अर्थसंकल्प  45 हजार 949 कोटींचा; आरोग्य, डिजिटल शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर
BMC | (File Photo)

मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2022 (BMC Budget 2022) जाहीर झाला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प जाहीर केला. मुंबई महापालिका (BMC) निवडणूक तोंडावर असताना अर्थसंकल्पात काय घोषणा होतात याकडे मुंबई (Mumbai) शहरासह प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थसंकल्पात शिक्षण, डिजिटल शिक्षण (Digital Education) आणि आरोग्यासह पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील नागरिकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन 'शिवयोग केंद्र' स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना यापुढे वापरकर्ता शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील जवळपास 3500 उपहारगृहांना कचऱ्याकरताही वापरकर्ता शुल्क भरावे लागेल.

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूदी

मुंबई महापालिका इयत्ता दहाविच्या जवळपास 19401 विद्यार्थ्यांना टॅब देणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात एकूण 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शालेयोपयोगी वस्तूही विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतील. यात वह्या, गणवेश, बुट-मोजे स्टेशनरी, सँडल, स्कूल किट, कॅनव्हास शूज व स्पोर्ट्स युनिफॉर्म यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. या साठी अपेक्षीत खर्ज गृहीत धरून 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुलीची शाळेतील उपस्थिती वाढावी यासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 7 कोटी 2 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात येणार आहे. (हेही वाचा, BMC Budget 2021: मुंबई महापालिका अर्थसंकल्प आज सादर होणार; सर्वासामान्यांना काय मिळणार याबाबत उत्सुकता)

व्हॉट्सॲप चॅटबॉट लॉन्च

नागरिकांना आपल्या सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत महानगरपालिकेने 14 जानेवारी 2022 रोजी 8999-22-8999 या क्रमांकावर व्हॉट्सॲप चॅटबॉट लॉन्च केला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या सुमारे 80 सेवा नागरिकांसाठी सहज उपलब्ध झाल्या आहेत. या ॲपचा वापर करून नागरिक दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याची, विविध शुल्क भरण्यासाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेट न देता व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या उपक्रमांची माहिती 24 x 7 मिळवू शकतात. याकरिता कोणत्याही नोंदणीची गरज नाही.

बेस्ट बसचा प्रवास मोफत

मुंबई महापालिकेच्या शाळेतील प्रथम 25 विद्यार्थ्यांना व्यावसायिक अथवा पदवी शिक्षणासाठी 25,000 रुपये शैक्षणि शुल्क देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट बसचा प्रवास मोफत असणार आहे. त्यासाठी जवळपास सव्वाचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, इयत्ता पहीली ते इयत्ता पाचीवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 6 किलो हरभरा आणि 6 किलो मसूर डाळ तसेच 100 ग्रॅम तांदूळ देण्यात येणार आहे. महापालिकांतर्गत शाळांमध्ये शिकणाऱ्या एकूण 2,88165 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होईल. तसेच, इयत्ता 6 वी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 9 किलो मसूर डाळ, 9 किलो हरभरा,150 ग्रॅम तांदूळ देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या योजनेचा लाभ 2, 74663 विद्यार्थ्यांना होईल.