मुंबईकरांनो स्वतः रस्त्यावरील खड्डे बुजवणं टाळा; सुरक्षा आणि कायद्याचं कारण देत BMC चं ट्वीटर द्वारे आवाहन
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

मुंबईत आता पाऊस ओसरत असला तरी रस्त्यावरील खड्डे (Mumbai Potholes) आणि त्यामुळे होणारे अपघात मात्र अद्याप कायम आहेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, अशावेळी मुंबईकर नागरिक वेळोवेळी फोटो काढून, आंदोलने करून पालिकेला खड्डे बुजवण्याचे सूचित करत असतात.  मात्र या सगळ्याच सूचनांचे वेळच्या वेळी पालन करण्यास पालिका (BMC) मागे पडते, आणि परिणामी नागरिकच स्वतः आपल्या पद्धतीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा मार्ग अवलंबतात. मात्र असे करणे नागरिकांच्या हिताचे नाही यामुळे अपघात आणखी वाढू शकतात असे म्हणत मुंबई महापालिकेने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये मुंबईकरांनो खड्डे बुजवण्याचे काम पालिकेला करु द्या, अनधिकृत पद्धतीने आपल्याकडील सामग्री वापरून खड्डे बुजवल्यास नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असे म्हंटले आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये असेही पालिकेतर्फे सांगण्यात आले.

BMC ट्विट

(हे ही वाचा- खुशखबर! आता मुंबई मधील खड्डे बुजणार 24 तासांत; फक्त पाठवावा लागेल फोटो, जाणून घ्या WhatsApp Number)

दरम्यान अनेकदा खड्ड्यांमुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे फोटो आपणही सोशल मीडियावर पहिले असतील. साहजिकच या नागरिकांना रस्त्यांच्या बांधणीसाठी आवश्यक सामग्रीचा वापर करणे नेहमी शक्य होत नाही म्हणून ते रॅबिट म्हणजेच तोडलेल्या लाद्यांचे, सिमेंटचे मिश्रण करून खड्डे बुजवतात. हा प्रकार अधिक काळ टिकत तर नाहीच मात्र यामुळे रस्त्याची अवस्था आणखीनच बिघडू शकते. त्यामुळे पालिकेच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांना खड्ड्यांची माहिती देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घ्यावीत असा या ट्विटचा आशय आहे.

टीप:  मागील काही काळात पालिकेसह अन्य सरकारी यंत्रणा सुद्धा सोशल मीडियावरून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. खड्ड्यांच्या संबंधित तक्ररींसाठी आपण या @mybmcRoads , @mybmc ट्विटर हँडल वर संपर्क करू शकता.