पुण्यामधील (Pune) जहांगीर हॉस्पीटल (Jehangir Hospital) हे लोकप्रिय हॉस्पीटलपैकी एक समजले जाते. काही दिवसांपूर्वी या हॉस्पीटलमध्ये देण्यात येणाऱ्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे गोळे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबतीत बेजबाबदार हॉस्पीटल प्रशासनावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. चौकशी झाल्यावर अन्न व औषध विभागाने हॉस्पिटलला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच कँटिनची तपासणी केल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी सुधारणेसाठी या महिन्याचा कालावधी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहांगीर हॉस्पिटलमध्ये वीणा सातपुते यांची प्रसूती झाली होती. प्रसूती झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पिण्यासाठी जे सूप दिले गेले त्यात रक्ताने माखलेले कापसाचे गोळे आढळले होते. हॉस्पिटलकडून रुग्णाच्या जीवाशी खेळणारी इतकी मोठी गोष्ट घडल्याचे पाहून, वीणा यांच्या चिडलेल्या पतीने लेखी तक्रार पोलिसांत दाखल केली व सर्व पुरावेही दिले. त्यानंतर याबाबत हॉस्पिटल त्या संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई करत नाही हे पाहून त्यांनी, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे धाव घेतली होती. (हेही वाचा: वांद्रे येथे रेल्वे फलाटावरील अन्नपदार्थात उंदिर, दुकान चालकाला 10 हजार रुपये दंड)
या तक्रारीनुसार हॉस्पिटलच्या कँटिनची तपासणी केली गेली. या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी या महिन्याअखेरची मुदत दिली आहे. तसेच घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल हॉस्पिटलला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान नुकतेच हल्दीराम या प्रसिध्द अन्नपदार्थ ब्रँडच्या नागपूर येथील एका दुकानात सांभारमध्ये चक्क पालीचे पिल्लू आढळून आले होते. अन्न आणि औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई करत हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.