मुंबई (Mumbai) येथे वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स (Bandra Kurla Complex) परिसरात निर्माणाधीन (Under Construction) असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला (BKC Flyover Collapsed) आहे. या दुर्घटनेत काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या कामगारांची संख्या 13 असल्याचे समजते. ही घटना शुक्रवारी (17 सप्टेंबर 2021) पहाटे 4.30 वाजणेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यही सुरु करण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बीकेसी मेन रोड आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड यांना जोडणारा उड्डाणपूल निर्माणाधीन आहे. काम सुरु असताना हा उड्डाणपूल पहाटेच्या वेळी अचानक कोसळला. प्राप्त माहिती अशी की, ही दुर्घटना घडली तेव्हा पूलावर 20 ते 25 कामगार काम करत होते. दरम्यान, पूलाचा एक गर्डर निखळायला सुरुवात झाली. काहीतरी गडबड आहे हे ध्यानात येताच मजूरही सतर्क झाले. दरम्यान, गर्डर निखळून खालीच पडला. त्यानंतर मजुरांनी तेथून पळ काढला. मात्र, ज्यांना पळता आले नाही ते मजूर पूलासोबतच खाली कोसळले. ते बाजूच्या नाल्यात कोसळले. त्यामुळे ते जखमी झाले. (हेही वाचा, मुंबई वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल, महामार्गावर वाहनांच्या वेगासाठी बनवले नवे नियम, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, या दुर्घटनेत जखमी झालेल्या मजूरांची दुखापत किती आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. पूल कोसळल्यावर आजूबाजूला मातिचा ढिगारा पसरला आहे. या ढिगाऱ्याखाली कोणी अडकल्याची अद्याप तरी माहिती नाही. उड्डाणपूल नेमका का कोसळला याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आली नाही.