भारतीय जनता युवा मोर्चाच्या (Bharatiya Janata Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव (Shyam Manav) यांच्या नागपूर येथील 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' सभेत मोठा गोंधळ घातला. या कार्यक्रमात मानव यांचे व्याख्यान होणार होते. मात्र, तत्पूर्वी कार्यक्रमात दुसरे वक्ते दशरथ मडावी बोलत असतानाच 'भाजयुमो'चे (BJYM) कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्यास सुरुवा केली. त्यांनी कार्यक्रमाचे फलकही फाडले आणि जोरजोराने घोषणा दिल्या.
संविधान बचाव महाराष्ट्र बचाव सभेत काय घडले?
नागपूर येथे 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सुरु झाला होता. कार्यक्रमात श्याम मानव यांचे व्याख्यान अद्याप व्हायचे होते. त्यांच्या व्याख्याना आधी दशरथ मडवी यांचे भाषण सुरु होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात संविधान धोक्यात आल्याचा उल्लेख वारंवार केला. याच वेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 2014 नंतरच संविधान कसं काय धोक्यात आलं? असा सवाल विचारत स्पष्टीकरण मागितले. त्यावर मडवी यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले भाषण सुरुच ठेवले. दरम्यान, भाजयुमो'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि ते मंचाच्या दिशेने चालत निघाले. याच वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. पोलिसही तेथे पोहोचले. याच वेळी एका कार्यकर्त्याने (भाजयुमो) मंचावर व्याख्याते आणि पाहुण्यांच्या पाठिमागे लावलेला बॅनर फाडला. (हेही वाचा, Aaditya Thackeray-Uddhav Thackeray यांना खोट्या प्रकरणांत अडकवा, तपास यंत्रणांसमोर जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून अनिल देशमुखांवर दबाव असल्याचा श्याम मानव यांच्याकडून खळबळजनक दावा)
अंनिस आणि भाजयुमो कार्यकर्ते आमनेसामने
भाजयुमो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते एका वेळी व्यासपीठावर आले. त्यामुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळ निर्माण झाला. या वेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. या वेळी पोलिसांना बळाचा सौम्य वापरही करावा लागला. पोलिसांनी श्याम मानव यांना पुरेसे संरक्षण देत व्यासपीठावर बसवले. तसेच, कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या 'भाजयुमो' कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर पीटाळले. (हेही वाचा, Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. या आधीही त्यांनी आपल्या विविध भाषणांच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे. मध्यंतरी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सरकारकडून विरोधकांना कशा प्रकारे नाडले जाते, अडचणीत आणले जाते, त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर केला जातो, याबाबत भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यासोबतच, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला संविधान धोक्यात असल्याचा प्रचार भाजपसाठी अडचणीचा ठरला होता. ज्याचा परिणाम महाराष्ट्रात सत्ता असूनही भाजपची खासदारांची संख्या एका आकड्यांंवर येऊन ठेपली. परिणामी भाजप आणि संबंधित संघटना विधानसभा निवडणुकीत अधिक सावध झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संविधान धोक्यात असल्याच्या प्रचाराबातब त्या आक्रमक भूमिका घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.