भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (छायाचित्र सौजन्य: सोशल मीडिया)

नालासोपाऱ्यात घडलेल्या भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या पदाधिकाऱ्याच्या मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. रुपाली चव्हाण असे या महिला पदाधिकाऱ्याचे नाव होते. घरकाम करणाऱ्या २० वर्षीय तरुणानेच रुपाली यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. नितीन चाफे असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी नितीन चाफे हा जुलै महिन्यापासून रुपाली चव्हाण यांच्य घरी काम करत होता. पोलिसांनी त्याला त्याच्या लातूर जिल्ह्यातील मूळ गावाहून अटक केली. रुपाली यांनी किरकोळ कारणावरुन शिवीगाळ केल्याचा राग नितीनच्या मनात होता. तसेच, रुपाली यांच्या घरातील पैसे हडप करण्याचाही नितीनचा इरादा होता. त्यातूनच त्याने रुपाली यांची हत्या केली व तो फरार झाला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, रुपाली चव्हाण या घटस्फोटित होत्या. त्यांना एक १० वर्षांचा मुलगाही आहे. तो आजोबांकडे राहतो. मुळच्या पुण्याच्या असलेल्या रुपाली या दोन वर्षांपूर्वी नालासोपारा येथे राहण्यास आल्या होत्या. पश्चिम नालासोपारा येथील निलेमोरे येथे साई लीला इमारतीत त्या राहात होत्या. राजकारणाची आवड असल्याने त्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. सध्या त्या भाजपच्या जिल्हा युवती सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. (हेही वाचा, भाजप महिला पदाधिकाऱ्याची इस्त्रीचे चटके देऊन नालासोपाऱ्यात हत्या)

दरम्यान, चव्हाण यांनी नालासोपारा येथे एक दुकान घेतले होते. या दुकानात त्या पादत्राणे विक्रिचा व्यवसाय सुरु करणार होत्या. दुर्दैवाने दुकानाचे उद्घाटन असलेल्या दिवशीच रुपाली यांची हत्या झाली. रुपाली यांचे वडीलही याच परिसरात काही अंतरावर राहतात. दुकानाच्या उद्घाटनासंदर्भातच त्यांनी रुपाली यांना मोबाईलवरुन फोन केला. मात्र, बऱ्याचदा फोन करुनही त्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे संशय आल्याने वडीलांनी रुपाली यांच्या घरी जाऊन पाहण्यास एका परिचितास सांगितले. परिचित रुपाली यांच्या घरी गेला असता त्यांची हत्या झाल्याचा प्रकार पुढे आला.