Jai Bhagwan Goyal | (Photo Credits: Facebook)

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) हे पुस्तक भाजपने प्रकाशित केले नाही. या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. या पुस्तकाशी आणि पुस्तकात व्यक्त झालेल्या मतांशीही भाजपचा कोणताही संबंध नाही, असे म्हणत भाजपने पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादापासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, हे पुस्तक परत घ्यायचे असेल तर, त्याबाबत पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक निर्णय घेतील, असेही भाजपच्या नेत्यांनी दिल्ली येथील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. असे असले तरी या पुस्तकाचे प्रकाशन मात्र, भाजप (BJP) कार्यालयात झाले होते. याबाबत भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आली नाही. दुसऱ्या बाजूला मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक आपण परत घेऊ असे पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल ( Jai Bhagwan Goyal) यांनी म्हटले आहे.

पुस्तक आणि त्याच्या शिर्षकावरुन निर्माण झालेल्या वादाबाबत बोलताना जय भगवान गोयल यांनी पुढे म्हटले आहे की, पुस्तक लिहिताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्याचे माझा कोणताही विचार नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे काम करायचे तसेच, पंतप्रधान मोदीही काम करतात, असे मला वाटते. त्यामुळे आपण पुस्तकावर तसा शिर्षकात उल्लेख केला. पण, यामागे कोणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे गोयल यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यातील महिला, मुली आणि जनतेची काळजी घेतली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्या जनतेची काळजी घेत आहेत. या सरकारच्या काळात प्रत्येक महिलेला आपण सक्षम असल्याचे वाटत आहे. मोदींच्या नेतृत्वात भारताचा सन्मान वाढला असल्याचेही गोयल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, शिवाजी महाराजांची तुलना करू नयेच! पण शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर का चालतं?- सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार)

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आदी पक्षांनी या पुस्तकावर जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला एखाद्या व्यक्तीस एखाद्या राष्ट्रपुरुष अधवा उपमा दिली म्हणून संबंधीत व्यक्ती त्या राष्ट्रपुरुषाइकी मोठी होत नाही. शिवाजी महाराजांची उपमा दिली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याइतके मोठे होऊ शकत नाहीत. परंतू, असे म्हणण्याची एक पद्धत असते. या आधी शरद पवार यांचाही जानाता राजा म्हणून उल्लेख केला आहे. तसेच, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनीही माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांदी यांनाबी 'दुर्गा' म्हटले होते. त्यामुळे अशा उपमा दिल्या जातात म्हणून त्या व्यक्ती काही देवत्त्वाइतक्या मोठ्या होत नसतात, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.