भाजप (BJP) खासदार मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी महाविकासआघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भेट घेतली आहे. मनेका गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुमारे 30 मिनीटे चर्चा झाली. प्राण्यांचे संरक्षण आणि पशुवैद्यकीय दवाखाना, प्राण्यांच्या दफनासाठी जागा या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मनेका गांधी यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. खासदार मनेका गांधी या प्राणिमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांनी वन्यजीव आणि इतर प्राण्यांचे संरक्षण आणि इतर मुद्द्यांवर अनेकदा आवाज उठवला आहे.
मनेका गांधी या भाजप खासदार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, मध्यंतरी झालेलया भाजपच्या नव्या कार्यकारीणीत मनेका गांधी यांना स्थान मिळू शकले नाही. त्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे पूत्र वरुन गांधी हे पिलभीत येथून खासदार आहेत. (हेही वाचा, Uttar Pradesh: वरुण गांधी योगी सरकारविरोधात आक्रमक, ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ, पोस्ट मधून निशाणा)
दरम्यान, पाठीमागील काही दिवसांपासून वरुन गांधी हे भाजपवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. वरुन गांधी यांनी अनेकदा भाजप नेतृत्वावर टीका करुनही मनेका गांधी यांनी एकदाही त्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. वरुन गांधी यांनी योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर वेळोवेळी टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत उत्सुकता आहे.