BJP Leader Ram Kadam ((Photo Credit: ANI)

दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी राज्यभर शिवजयंतीचा (Shiv Jayanti) उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होता. मात्र यंदा कोविड-19 (Covid-19) संकटामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावर निर्बंध घालत शिवजयंती साजरी करण्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. यावरुन आता भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून शिवजयंती उत्साहात साजरी करु न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राम कदम यांनी दिला आहे. तसंच त्यांनी काही सवालही उपस्थित केले आहेत.

राम कदम यांनी ट्विटद्वारे हे पत्र शेअर केले आहे. पत्रात त्यांनी लिहिले की, "कोरोना संकटातून महाराष्ट्र सावरत आहे. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत होत असून विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा होत आहेत. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का?"

पुढे त्यांनी लिहिले की, "गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात सात्तयाने हिंदूंची गळचेपी होत आहे. पालघरमधील साधू हल्ल्यातही राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव वेबसिरीजमधून हिंदू देवदेवतांचा अवमान झाला. त्यावेळीही सरकार गप्प होतं. आता शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध लादून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे." तसंच शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करु, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

राम कदम ट्विट:

दरम्यान, काल राज्य सरकारकडून शिव जयंती साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती उत्सवावर काही निर्बंध लादण्यात आले आहेत.