Nitesh Rane on Maharashtra Police Mega Bharti 2020: मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरच सर्वात मोठी मेगा भरती का? भाजप आमदार नितेश राणे यांचा सवाल
Nitesh Rane (Photo Credits: PTI)

राज्यातील पोलिस दलात सर्वात मोठी भरती करण्याचा निर्णय काल (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आक्रमक झाले आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यानंतरच सर्वात मोठी मेगा भरती का? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे. तसंच राज्य सरकार जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती.. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात.. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का?? असे सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थिती केले आहेत.

Nitesh Rane Tweet:

दरम्यान राज्यात पोलिस दलात आतापर्यंतची सर्वात मोठी भरती करण्याच ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस दलात तब्बल 12,528 पदांसाठी भरती होणार आहे. तसंच लवकरच भरतीची प्रक्रिया सूरू होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत ट्विटद्वारे अनेक सवाल केले आहेत. परंतु, ही भरती सर्व समाजाला न्याय देणारी असेल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास गेल्या आठवड्यात स्थगिती दिल्यानंतर पेच निर्माण झाला. त्यानंतर मराठा समाज, राजकीय नेते यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रीया नोंदवली. यावरुन राज्य सरकारवर टीकाही करण्यात आली. परंतु, मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले आहे. तसंच सरकार ठामपणे  मराठा समाजाच्या बाजूने उभे असल्याने आंदोलन न करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आंदोलन न करण्याचेही आवाहन केले आहे.