CAA- NRC ला पाठिंबा देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा कार्यक्रम भाजपकडून Postpone; वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे यांच्या विरोधानंतर घेतला निर्णय
File image of school children | (Photo Credits: PTI)

भाजप सरकारचा (BJP Government) मोठा निर्णय म्हणजे CAA- NRC देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप नेत्यांकडून वारंवार या निर्णयाची पाठराखण करत इतरांना सुद्धा या समर्थनात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, याचाच एक भाग म्ह्णून माटुंगा स्थित श्री दयानंद शाळेत भाजप नेत्यांनी एकत्र येऊन CAA विरोधकांना देशद्रोही म्हणत त्यांचा विरोध करा असे आवाहन 9 ते 17 वयोगटातील 1000 मुलांना व तब्बल 40 शिक्षकांना केले होते, यानिमित्त आज विद्यार्थी आंदोलन करण्यात येणार होते, मात्र यावर मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे (Rajendra Ahire) यांनी, शैक्षणिक संस्थेत राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्पष्टीकरण देण्यास सांगितले, तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला. या विरोधामुळे स्वतः भाजपकडूनच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.(हेही वाचा: हिंसाचार थांबल्यानंतर CAA बाबतच्या वैधतेवर सुनावणी होणार- सुप्रीम कोर्ट)

प्राप्त माहितीनुसार, याच संदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका ट्विटमध्ये “शाळांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणे हास्यास्पद असल्याचे म्हंटले आहे. शाळांचे राजकारण करणे खपवून घेतले जाणार नाही. जर राजकारण्यांना शाळांमध्ये बोलायचे असेल तर लैंगिक समानता, हेल्मेट, स्वच्छतेवर बोलावे पण दूषित राजकारणी मुद्दे मांडू नयेत असा इशाराही आदित्य यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे ट्विट

दरम्यान, भाजप नेत्यांच्या या प्रयत्नावर वर्षा गायकवाड यांनी चांगलीच झोड घेतली, प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचे राजकारण करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे, उपसंचालकांनी अहवाल सादर केल्यावर अल्पवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची संमती न घेता एखाद्या राजकीय कार्यक्रमात सामील केल्याबद्दल आम्ही शाळेविरूद्ध कारवाई करू.” असे देखील त्या म्हणाल्या.

दुसरीकडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "शाळा या काही राजकीय अजेंडा निर्माण किंवा प्रसारित करणारे माध्यम नाहीत, निदान लहान मुलांना तरी यातून दूर राहू द्या" असे म्हणत या कार्यक्रमासाठी विरोध दर्शवला होता.