दिवसाढवळ्या धमक्या देऊ नका, महाराष्ट्र कुण्या एकट्याची जागीर नाही; राम कदम यांचा नाना पटोले यांच्यावर पलटवार
Ram Kadam, Nana Patole (Photo Credits: Facebook & PTI)

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी मोदी सरकारच्या अत्याचाराविरोधात भूमिका मांडावी अन्यथा महाराष्ट्रात त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी  दिल्यानंतर भाजप नेते राम कदम (Ram Kadam) अभिनेत्यांची पाठराखण केली आहे. दिवसाढवळ्या धमक्या देऊ नका, महाराष्ट्र कुण्या एकट्याचा नाही, असं म्हणत राम कदम यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. (अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी मोदी सरकारच्या अत्याचाराविरोधात भूमिका मांडावी अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे बंद पाडू; नाना पटोले यांचा इशारा)

राम कदम म्हणाले की, "अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा यात काय अपराध आहे? यांच्यासारखे सन्मानित कलाकार देशहितासाठी देशाच्या बाजूने ट्विट करत असतील हा अपराध आहे का? विदेशात बसलेले षडयंत्रकारी लोक आपल्या देशाला बदनाम करायला निघालेत. त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस पक्ष आणि नेते यांना झालंय तरी काय? देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने उभा राहणाऱ्या प्रत्येकासाठी, प्रत्येक कलाकाराच्या पाठीमागे हा अखंड देश उभा आहे. दिवसाढवळ्या धमक्या देऊ नका, महाराष्ट्र कुण्या एकट्याचा नाही."

राम कदम ट्विट:

काय म्हणाले होते नाना पटोले?

काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवरुन आक्रमक भूमिका घेणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का? त्यावेळेस जसं लोकशाही मार्गाने ट्विटवरुन टीका करत होतात. त्याप्रमाणे आताही मोदी सरकारच्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात भूमिका मांडा. अन्यथा तुमच्या सिनेमाचे शूटिंग किंवा प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी कलाकरांची बाजू घेत काँग्रेसला प्रत्त्युतर दिले आहे.