Coronavirus मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत भाजप नेते निलेश राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात; पहा ट्विट
Uddhav Thackeray and Nilesh Rane (IANS and facebook)

कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगासह भारतावरही घोंगावत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. आज देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सारं काही बंद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (CM Uddhav Thackeray) आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्यासह संपूर्ण टीम कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी झटत आहे. त्यातच शिवसेनेवर नेहमीच टीका करणारे भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेतला आहे. (मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 3 दिवसांच्या सुट्टीवर निलेश राणे यांची टिका; म्हणाले झेपत नसेल तर CM पद सोडा)

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कोरोना बाधित रुग्णांना ठेवायला जागा अपूरी पडत असल्यास किंवा विलगीकरण कक्ष, इतर वैद्यकीय सुविधांची गरज असल्यास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी येथील जागा आम्ही देऊ." या ट्विटमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट टॅग केलं आहे.

निलेश राणे यांचे ट्विट:

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव व्हायरसवर संजय राऊत यांची पत्रकार परिषद पाहण्यापेक्षा कोरोना व्हायरस वर आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहणे चांगले, असा टोला त्यांनी लगावला होता.