Chandrakant Patil Criticizes Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला
Chandrakant Patil And Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Shiv Sena Dasara Melava 2020) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्तावर भाष्य करत विरोधीपक्षातील नेत्यांचा समाचार घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांच्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील आक्रमक भुमिका घेतली आहे. 'खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तसेच बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार आहात?, अशा शब्दात चंद्रकांत पटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबईतली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील विविध विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीकेची तोफ डागली होती. दरम्यान, आम्हाला देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवले. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरे येतेय काय? मला अतिरेक्यांना बडवणारे हिंदुत्व हवंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'शिवसेना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार ते हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहेत. बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस अशा पोळ्या ते भाजणार आहेत? खुर्चीसाठी त्यांनी दिलेली हिंदुत्वाची शिकवण आज ते विसरले आहेत, हेच सत्य आहे', अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. हे देखील वाचा- Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray: 'टाचणी तैयार आहे, फक्त योग्य वेळ येऊन दया' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर नितेश राणे यांची टीका

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एवढेच नव्हेतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फ्लॉप चित्रपटासारखा होता, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.