Rane Vs Thackeray: 'उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही बाजुला जाणारं गांडूळ, बेईमानी करून पद मिळवल्याचा' नारायण राणे यांचा पलटवार
Narayan Rane And Uddhav Thackeray (Twitter)

शिवसेना मेळावा 2020 मधील भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि कुटुंबीय यांच्यावर टीका करताना 'बेडकाची' उपमा देत तोफ डागल्यानंतर आज नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. दरम्यान हिंदुत्त्वाची भाषा करणार्‍या शिवसेनेने बेईमानी करत सेक्युलर पक्षांसोबत जाऊन सत्ता मिळवली आहे. या वेळेस उद्धव ठाकरे म्हणजे दोन्ही बाजुला जाणार्‍या 'गांडुळा'प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. बेडूक तरी एका दिशेला उडी मारतो पण तुम्ही दोन्ही दिशेला जाता असं म्हणत पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड केली आहे. Shiv Sena Dasara Melava 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नारायण राणे यांच्यावर जहरी टीका; शिवसेना दसरा मेळावाच्या भाषणात बेडूक म्हणून केला उल्लेख

शिवसेना मेळावा 2020 मधील भाषण हे निर्बुद्ध बरळणं भाषण असल्याचं म्हटलं आहे.  सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अजूनही सीबीआय तपास सुरू असताना आदित्य ठाकरेंना परस्पर क्लिन चीट देण्यात आली आहे असं म्हणताना या भाषणात वैचारिक मांडणी नव्हती तर केवळ आदित्यचा बचाव करण्यासाठी केलेलं आयोजन होतंं. या प्रकरणात आदित्य ठाकरे जेल मधील जातील त्यांना पद सोडावं असं भाकित देखील नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. सुशांतसिंग राजपूत सोबतच त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी देखील सखोल चौकशीची गरज असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये ठाकरे कुटुंबाचा हात नाही हे आता बोलणं घाईचं आहे. तपास सुरू आहे. लवकरच सत्य बाहेर पडेल असंं म्हणत पुन्हा त्यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे परिवारावर गंभीर आरोप केले आहेत.

नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर कडाडताना मातोश्री मधील आणि बाहेरील गोष्टी बाहेर काढल्या तर पळता भुई थोडी होईल असं म्हटलं आहे. तसेच हिंदुत्त्वाचा विचार करता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिकवणारे कोण? असं म्हटलं आहे. पाकव्याप्त कश्मीर सोडा आधी बेळगावचा प्रश्न सोडवा असं आव्हान देखील केले आहे. महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीत असताना, शेतकर्‍यांचे  प्रश्न गंभीर असताना मुख्यमंत्री पदी असलेले उद्धव ठाकरे घर सोडत नाही. असं म्हणत त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील बोट ठेवलं आहे.

नारायण राणे आणि शिवसेना प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचं जुनं वैर आहे. शिवसेनेत असल्यापासून दोघांमध्ये खटके उडाले आहेत. आता एकमेकांसमोर उभे राहिल्यांनंतर दोघांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.