तौक्ते चक्रीवादळानंतर (Cyclone Tauktae) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर आणि सरकारने हाताळलेल्या एकूण परिस्थितीवर राज्यातील विरोधकांकडून जोरदार टीका झाली. टीकेचा हा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. आता सामना मधील ममतादीदींच्या एका बातमीचा दाखला देत भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे. 'तौक्ते चक्रीवादळात मुख्यमंत्री दडी मारुन बसले होते, हे सांगण्याची काय तऱ्हा आहे' असं म्हणत 'मालकाच्या कर्तृत्वाचं जाहीर पोतेरं करू नये', असा खोचक सल्ला देखील भातखळकर यांनी राऊत यांना दिला आहे.
'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मंगळवारी रात्रभर मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात थांबल्या होत्या. त्यासाठी ममता बॅनर्जी यांचं कौतुक करणारी बातमी सामनाने छापली होती. यावरुन अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि संजय राऊत या दोघांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा... सामानाची बातमी... 'यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.' मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये."
अतुल भातखळकर ट्विट:
संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात @OfficeofUT घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा...
सामानाची बातमी...
'यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.'
मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये.@rautsanjay61 😂 pic.twitter.com/7Hda1T7EUw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 26, 2021
घराबाहेर पडत नाहीत म्हणून यापूर्वी अनेकदा विरोधकांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळानंतरच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, निलेश राणे, नितेश राणे यांच्यासह नारायण राणे या भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले होते. विशेष म्हणजे यात मनसे देखील उडी घेतली होती.