भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना लाच प्रकरणात न्यायालयाचा दणका; 5 वर्षे कारावास व पाच लाख दंडाची शिक्षा
वर्षा भानुशाली आणि पीएम नरेंद्र मोदी (संग्रहित संपादित प्रतिमा)

भाजपच्या (BJP) मीरा-भायंदर (Mira-Bhayander) महापालिकेतील नगरसेविका वर्षा भानुशाली (Varsha Bhanushali) यांना लाच (Bribe) प्रकरणात न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ठाणे न्यायालयाने वर्षा यांना लाच प्रकरणात दोषी ठरवत 5 लाख रुपये दंड आणि 5 वर्षे कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. वर्षा यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. यातील पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी त्यांना सापळा रचून पकडले होते. वर्षा यांनी दंड न भरल्यास त्यांना अजून 6 महिने कारावास होऊ शकतो. 2007 साली महापालिका निवडणूकीत वर्षा भानुशाली आणि नरेंद्र मेहता हे एकत्र पॅनल मधून अपक्ष म्हणून निवडून आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गाळ्याची बेकायदेशीर उंची वाढवण्यासाठी वर्षा यांनी 1 लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. 6 जून 2014 रोजी त्यांना याचा पहिला हफ्ता मिळणार होता. यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. भाईंदरच्या मॅक्सस मॉल समोरील जानकी हेरिटेज इमारतीतील राहत्या घरात त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर न्यायालयात याबाबत केस उभी राहिली. (हेही वाचा: धक्कादायक! मंत्र्याने लाच म्हणून मागितल्या बॉलिवूडच्या 2 अभिनेत्री; सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने माजली खळबळ)

अखेर न्यायालयाने वर्षा यांना दणका देत त्यांना 5 वर्षे कारावास व 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, मुंबई महापालिकेने शहरातील खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा ही योजना सुरु केली होती, अशीच योजना मीरा-भायंदर महापालिकेत सुरु करा असे पत्र वर्षा यांनी नुकतेच आयुक्तांना लिहिले होते यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.