महाराष्ट्रात पुन्हा कमळ फुलणार; तर जनता काँग्रेसचा हात सोडणार, पाहा एक्झिट पोलचा अंदाज

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Election 2019) चे मतदान आज पार पडले. यामुळे विविध चॅनलवर एक्झिट पोल (Exit Poll) सुरु झाले आहे. या निवडणुकीतही भाजप (BJP) हा मजबूत स्थितीत असल्याचे एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. त्याचबरोबर यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेससह (Congress) इतर पक्षाच्या हाती केवळ अपयश लागेल, असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. एकीकडे एक्झिट पोलवर नजर टाकली तर, भाजप कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. दुसरीकडे एक्झिट पोल हा केवळ शक्यता दर्शवण्याचे काम करत असतो. परंतु खरा निकाल अद्याप लागला नसून निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागेल, असे काँग्रेसच्या समर्थक म्हणाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार महाराष्ट्रात 63 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघात 288 जागांसाठी सोमवारी मतदान झाले. राज्यात भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकमेकांच्या समोर उभे आहेत.

रिपब्लिक-जन एक्झिट पोलचा अंदाज-

भाजप: 135-142 जागा

शिवसेना: 81-88 जागा

काँग्रेस: 20-24 जागा

एनसीपी: 30-35 जागा

इतर: 8-12 जागा

न्युज १८ एक्झिट पोलचा अंदाज-

भाजप-शिवसेना युतीला 243 जागा

काँग्रेस-एनसीपी- 39 जागा

इतर पक्षांना- 06 जागा

ABP एक्झिट पोलचा अंदाज-

भाजप-शिवसेना: 204 जागा (46 टक्के मत)

काँग्रेस-एनसीपी: 69 जागा (37 टक्के मत),

इतर: 15 जागा (17 टक्के मत).

आजतक-Axis एक्झिट पोलचा अंदाज-

भाजप-शिवसेना: 166-194 जागा

कांग्रेस-एनसीपी: 72-90 जागा

इतर: 22-34 जागा

हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे आणि खरा निकाल गुरुवारी 24 ऑक्टोबरला लागणार आहे. परंतु या एक्झिट पोलच्या अंदाजाने पुन्हा राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.