शनिवारवाडा (PC - Facebook)

महाराष्ट्रामध्ये पुणे (Pune) हे अधिकृतपणे राज्यातील सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र असलेले शहर बनले आहे. राज्य सरकारने काल पुणे महानगरपालिका (PMC) हद्द विस्तारित करण्याचे आदेश दिले होते. सध्याच्या शहराच्या हद्दीत 23 नवीन गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन शहरी मर्यादेसह पुणे हे देशातील सातव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहरही बनले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने मागील वर्षी 23 डिसेंबर रोजी पीएमसीच्या हद्दीत नव्या क्षेत्राचा समावेश करण्याची घोषणा करून अधिसूचना जारी केली होती.

मात्र बीएमसीच्या 39,038 कोटी रुपयांच्या बजेटच्या तुलनेत पीएमसीचे 2021-22 साठी अंदाजे 8,370 कोटी रुपये बजेट आहे.

ही 23 गावे झाली पुण्यात समाविष्ट –

म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली. (हेही वाचा: केंद्र सरकार कडून करण्यात आलेल्या 102 व्या घटना दुरुस्तीच्या प्रश्नी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

2014 मध्ये, राज्य सरकारने पीएमसीच्या हद्दीत 34  गावे समाविष्ट करण्याचा आपला हेतू जाहीर केला होता, परंतु ती प्रक्रिया लांबणीवर पडली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर 2017 मध्ये केवळ 11 गावे पीएमसीमध्ये समाविष्ट करण्यात आली. लोहगाव, मुंडवा, हडपसर, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरळी देवाची ही ती 11 गावे होय.

आता 23 गावे समाविष्ट झाल्यानंतर पुण्याची प्रस्तावित हद्द 516.18 चौरस किलोमीटरपर्यंत वाढली आहे. यासह पुणे ही राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरली आहे. या निर्णयामुळे 23 गावांचा विकास होण्यास मदत मिळणार आहे. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.