सांगली (Sangli) शहरातील राजवाडा चौक (Rajwada Chowk) परिसरात रंगलेला थरार अखेर 14 तासांनी संपला. या परीसरात एक बिबट्या घुसल्यापासून हा थरार सुरु झाला होता. बुधवारी (31 मार्च) सकाळी सव्वा सात वाजता या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले. तेव्हापासून बिबट्याला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. अखेर रात्री 9.30 वाजणेच्या दरम्यान बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यांनतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद (Bibtya Jerband) केले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी जेरबंद केलेल्या बिबट्याचा पिंजरा घेऊन कुपवाडच्या वनविभाग कार्यालयात गेले. त्यानंतर वरिष्ठांचे आदेश मिळताच या बिबट्याला नैसग्रिक अधिवासात सोडण्यात आले.
सांगलितील राजवाडा चौकात असलेल्या महापालिका शॉपिंग कॉम्पलेक्स जवळ काही नागरिकांनी बिबट्याला पाहिले. सकाळी सव्वा सात वाजणेच्या दरम्यान, बिबट्या महापालिका शाळा क्रमांक दहाच्या इमारतीवरुन खाली उडी घेताना निदर्शनास आला. सकाळची वेळ त्यात कोरोनामुळे निर्बंध असल्याने रस्त्यावर तशी तुरळकच वर्दळ होती. चहा विक्रेते नामदेव खामकर यांनी पहिल्यांदा बिबट्यााल पाहिले. दरम्यान, पुढच्या काही सेकंदाद बिबट्याने उडी घेतली आणि तो यसीआयसीआय बँकेच्या शेजारच्या पडक्या इमारतीला लावलेल्या पत्र्यावरून आतमध्ये घुसला. (हेही वाचा, Sangli Leopard: सांगली शहरातील राजवाडा परिसरात बिबट्या दिसला; विभागाची धावपळ, नागरिकांची भीतीने उडाली गाळण)
शहरात बिबट्या घुसल्याची माहिती पोलीस आणि महापालिकेसह वन विभागाला देण्यात आली. पोलीस आणि वन विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात संचारबंदी लावण्यात आली. बिबट्याचा शोध सुरु झाला. दाटीवाटीचा परिसर आणि अडगळ असल्याने बिबट्या नेमका कोठे लपला आहे हे कळत नव्हते. त्यात बघे आणि हुल्लडबाजांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे अडथळा अधिकच वाढला. त्यामुळे रॉकेल लाईन परिसरातही जमावबंदी करण्यात आली. राजवाडा चौक ते पटेल चौक हा रस्ता बंद करण्यात आला. पोलिसांनी कायद्याचा वापर करत गर्दी पांगवली आणि मग खऱ्या अर्थाने सुरु झाली बिबट्यासाठी शोधमोहीम.
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास सुरु झालेली मोहीम उशीरपर्यंत सुरु होती. रात्री पावणे नऊच्या सुमारास शूटरला बिबट्या दिसला. त्याने ट्रॅनकोलायझेशन गनच्या माध्यमातून बिबट्याला तीन डोस दिले. त्यातील दोन इंजेक्शन बिबट्याला बसली. त्यानंतर काहीच वेळात बिबट्या बेशुद्ध झाला. मग त्याला जेरबंद करण्यात यश आले. तब्बल 14 तास चाललेली ही मोहीम संपली.