ठाणेच्या भिवंडीत (Bhiwandi) येथे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेची गळा चिरुन हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली जात आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? याची माहिती अद्याप समजू शकली नाही. ओळखीतील व्यक्तीकडून या महिलेची हत्या करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
लक्ष्मी उर्फ पूजा भुरला (वय, 46) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. लक्ष्मी या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. त्यांच्या पतीचे निधन झाले असून त्या आपल्या मुलासोबत राहतात. तसेच त्यांचा मुलगा हा रात्रपाळीचे काम करत असल्याची महिती मिळत आहे. लक्ष्मी यांचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून शनिवारी सकाळी घरी परतला. त्यावेळी घराला लॉक होता. त्याने घराचा दरवाजा उघडून बघितले असता घरात लक्ष्मी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याला दिसला. त्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेची माहिती होताच पोलीस व फॉरेंसिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या स्थानिक पोलीस याबाबत मयताच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत, अशी माहिती टीव्ही9 मराठीने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Nala Sopara Train Accident: नालासोपारा येथे रेल्वे अपघातात तीन जणांचा मृत्यू तर एकजण जखमी
दरम्यान, ओळखीतील व्यक्तीकडून महिलेचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या घराचा दरवाजा आतून उघडण्यात येऊन महिलेची हत्या करण्यात आली आहे. घरातील एकही वस्तूची चोरी गेलेली नाही. शहर पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तसेच लवकरच या घटनेतील आरोपीला पकडण्यात येईल, असाही विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.