Bhima Koregaon Violence Case:  NIA टीम पुणे आयुक्तालयात दाखल; पुणे पोलिसांकडे केली कोरेगाव भीमा प्रकरणाच्या कागदपत्रांची मागणी
NIA Team In Pune | Photo Credits: Twitter/ANI

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा (Bhima Koregaon Violence Case) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA)कडे देण्यात आल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज NIA चे पथक पुणे आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी आज 'एल्गार परिषद' प्रकरणी कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी पुणे पोलिसांकडे (Pune Police) केली आहे. आज सकाळपासून एनआयए टीमचे मुंबईतील 3 अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचारामध्ये तत्कालीन सरकारचं षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. सोबतच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहण्यात आले होते. त्यानंतर सध्या या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे यासाठी एनआयएकडे तपास - शरद पवार.

केंद्र सरकारचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये हस्तक्षेप वाढत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान एनआयएकडे एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास सोपवणं हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. दरम्यान “महाराष्ट्र राज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला हे घटनेच्या विरोधात आहे केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो”, असं ट्वीट देखील केले आहे.

ANI Tweet  

भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत केली जावी. देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला आहे, फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली आहे असा शरद पवारांचा आरोप आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आहे.