कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) विजयस्तंभ (Vijaystambh) शौर्यदिनानिमित्त (Shaurya Din) कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली. सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. (हेही वाचा - Koregaon Bhima: शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मद्यविक्रीस बंदी)
दरम्यान स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. 29 ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. 20 फिरते दूचाकी आरोग्य पथक, 50 रुग्णवाहिका 90 तज्ज्ञ डॉक्टर आणि 200 आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात 100 खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त अभिवादन सोहळ्यात गतवर्षी सुमारे 12 लाख अनुयायी सहभागी झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनुयायांच्या संख्येत 25 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.