Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कोकण विभागातील प्रमुख नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत हा निर्णय प्रसारमाध्यमांना सोमवारी (9 सप्टेंबर 2019) कळवला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थिती जाधव हे शिवसेना प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते नेमके भाजपमध्ये प्रवेश करणार की शिवसेना पक्षात याबाबत उत्सुकता होती. अखेर जाधव यांनी स्वत:च पत्रकार परिषद घेत ही उत्सुकता संपवली. जाधव यांच्या निर्णयानंतर त्यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे 'घरवापसी' असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भास्कर जाधव हे मूळचे शिवसैनिक. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या भास्कर जाधव यांनी काही कारणाने शिवसेना सोडली आणि शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भास्कर जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने त्या वेळी शिवसेनेला कोकणात जोरदार धक्का बसला होता. मात्र, मूळचे शिवसैनिक असलेल्या भास्कर जाधव यांचे मन गेल्या काही काळापसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले होते. (हेही वाचा, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री गणेश नाईक यांचा 11 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश; सोबत 55 नगरसेवकही हाती घेणार कमळ)
दरम्यान, भास्कर जाधव हे महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. कोकणातील एक प्रमुख नेते अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. आक्रमक स्वभाव आणि आक्रमक भाषणासोबतच आक्रमक राजकारण असे जाधव यांचे व्यक्तीमत्व आहे. भास्कर जाधव येत्या 13 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश करणार आहेत.