Shiv Sena Leader Jaywant Parab Passes Away: भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस व शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत परब यांचे दिर्घ आजाराने निधन
Shiv Sena Leader Jaywant Parab Passes Away (Photo Credit : Twitter)

शिवसेनेचे (Shiv Sena) जेष्ठ नेते व कामगार नेते श्री. जयवंत परब (Jaywant Parab) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 73 वर्षीय परब हे शिवसेनेचे आक्रमक स्थानिक नेते म्हणून ओळखले जायचे. पंचतारांकित हॉटेलमध्ये कामगार सेना पोहचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तरुणांच्या रोजगारासाठी थेट कुठेही धडक देणारा, सहकाराच्या माध्यमातून अर्थपुरवठा करून उद्योगी बनवणारा नेता म्हणून ते लोकप्रिय होते. एकेकाळी कामगार क्षेत्रात प्रचंड दबदबा असणारे व कामगार हा आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे असे मानणारे ते जेष्ठ कामगार नेते होते.

जयवंत परब यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता डीएन नगर येथून निघणार आहे. शनिवारी रात्री उशिरा मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई महापालिकेत ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक राजकीय पदांवर ते कार्यरत होते. स्वर्गीय रमेश मोरे यांच्या मृत्यू पश्चात भारतीय कामगार सेनेमध्ये ते सक्रिय झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून असा परिवार आहे.

मसुरे गावात समर्थ पतसंस्थेच्या मार्फत युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत अनेक संसार उभे करण्याचे काम त्याने केले होते. शिवसेनेचे कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभे करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मसुरे गावात इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करून गावातील मुलांना इंग्रजीचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत धडपडत होते. भंडारी समाजाचे कार्य जोमाने चालू राहण्यासाठी त्यांचे सहकार्य नेहमीच होते. (हेही वाचा: कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या साम्यवादी नेत्या कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे निधन)

जयवंत परब यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.