बस मध्ये तिकीट काढताना कंडक्टरशी सुट्ट्या पैशावरून होणारी भांडणे आपण आजवर पहिली असतील, कधीतरी हे वाद वाढत जाऊन मारामारी झाल्याचेही आपल्या ऐकिवात असेल पण यापुढे निदान मुंबईत याबाबत उलटी गंगा वाहणार आहे. प्राप्त माहितीनुसार, बेस्ट (BEST) च्या बसभाड्यात कपात केल्यापासून आत बेस्ट प्रशासनाकडे एवढे चिल्लर येऊ लागले आहेत की प्रवासी तर सोडाच आता नागरिक आणि दुकानदारांना सुद्धा बेस्टने सुट्टे पैसे पुरवण्याचे ठरवले आहे. ही सुविधा मुंबईतील सर्व बेस्ट आगारां (Mumbai Bus Depot) मध्ये उपलब्ध असणार आहे, त्यामुळे यापुढे कंडक्टरशी वाद तर सोडाच पण तुमच्याकडील मोठया नोटा देऊन तुम्ही सहज सुट्टे पैसे मिळवू शकता.
बेस्ट प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिकिटाचे कमीत कमी दर 5 रुपये केल्यापासून बेस्ट कडे 1,2,5आणि 10 रुपयांची नाणी व 10 व 20 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. अगदी रोजच्या तिकिट विक्रीतून साधारणपणे `10 ते 12 लाखांची नाणी, सुट्टे पैसे जमा होतात. ही नाणी आणि नोटा सुट्टे पैसे म्हणून नागरिकांना , व्यापारीवर्गाला देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या सर्व बस आगारामधे तिकीट व रोख विभागात रविवार आणि सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, जून मध्ये मुंबई महापालिकेने बेस्टला सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यातील 100 कोटी अनुदान घेताना बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. याला मंजुरी मिळताच 21 जून पासून ही भाडे कपात लागू करण्यात आली होती.