बेस्ट संपावेळी इतर कर्माचाऱ्यांच्या समवेत संपात चौथ्या दिवशी सहभागी झालेल्या रवींद्र घाणेकर यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. रवींद्र हे बसचालक असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचे काल निधन झाले आहे. देवनार डेपो येथे असताना रवींद्र यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावेळी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
परंतु रविवारी (20 जानेवारी) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यामुळे घाणेकर यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र घाणेकर हे खारघर येथे राहत असून त्यांना दीड वर्षाची एक लहान मुलगी आहे. संपाच्या चौथ्या दिवशी घाणेकर कामावर आले होते. मात्र कामावर आल्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने सर्व कर्मचारी घाबरले.
या स्थितीत घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्माचाऱ्यांनी त्यांना तातडीने सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली होती. अखेर काल उपचारादरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले आहे.