खुशखबर! बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात; बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा
दिवाळी बोनस Photo Credit : IANS)

मुंबईकरांच्या प्रवासातील एक महत्वाचा मार्ग म्हणजेच बेस्ट (BEST)  सेवा, कित्येक प्रवासी अगदी दररोज या सेवेचा लाभ घेत असतात, मात्र अनेकांचे मार्ग सुकर करणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था अनेकदा बिकट असल्याचे वृत्त समोर येते. परिणामी बेस्टचा संप आणि तत्सम मार्गाने आंदोलने सुद्धा होत असतात. मात्र यावेळेस अपवाद म्ह्णून का होईना पण बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. यंदा औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनातर्फे बोनस मिळणार आहे. या निर्णयानुसार बेस्ट मधील सर्व कर्मचाऱ्यांना तब्बल 9 हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याने यंदाची दिवाळी (Diwali 2019) आनंदात जाणार असल्याची सुचिन्हे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बेस्ट उपक्रमात काही महिन्यांपासून वेतन करारावरून वेगवेगळ्या कामगार संघटनांमध्ये वाद होते. बेस्टमधील शिवसेना, भाजप समर्थक कामगार संघटनांनी वेतन करारास मान्यता दिली होती तर, कृती समितीच्या अंतर्गत येणाऱ्या संघटनांनी यासाठी विरोध दर्शवला होता. या संदर्भात बेस्ट तर्फे नवीन कामगार करारास संमती देणाऱ्या कामगारांनाच बोनस मिळण्याची घोषणा केली होती. मात्र बेस्ट कामगार संयुक्त कृती कामगार समितीने याप्रकरणात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली ज्याची  दखल घेत या न्यायालयाने समितीने कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना बोनस देण्याचा निर्णय दिला आहे. परिणामी शुक्रवारी, 18 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणाऱ्या बेस्टच्या संपाला सुद्धा तूर्तास मनाई केली आहे.

खुशखबर! आता BEST प्रशासन नागरिकांना पुरवणार सुट्टे पैसे, जाणून घ्या काय आहे नवी योजना

दरम्यान, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत तातडीने विलीन करावा, सातव्या वेतन आयोगासह दिवाळी सानुग्रह अनुदान मिळावे, यासहित अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार संपाचा इशारा दिला जात आहे. या सर्वात बोनसच्या बातमीने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.