Belgavi Municipal Corporation Election Result 2021: बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या (Belgaum Municipal Corporation Election) मतमोजणीला आज (6 सप्टेंबर) सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. या निवडणूकीत भाजप, काँग्रेस, आप, एमआयएम, निधर्मी जनता दल यांच्यात लढत झाली. बेळगाव महानगरपालिका एकूण 58 प्रभागांत मतदान पार पडले, यात एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 अशी उमेदवारांची संख्या असून त्यांचे भवितव्य आज ठरणार आहे. (Belgaum Municipal Corporation Election: बेळगाव महापालिका निवडणूक 58 प्रभागांसाठी 385 उमेदवार रिंगणात)
मतमोजणी करताना चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तासह मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडले असून आज निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली.
विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीनं देखील बहुसंख्य वार्डात आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या निवडणुकीत बेळगाव पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे काही वेळातच स्पष्ट होईल.