साईबाबा जन्मस्थळाच्या वादात बीडकरांचीही उडी; साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा करत तीर्थक्षेत्रासाठी मागितला 100 कोटींचा निधी
Sai Baba (Photo Credits: Shirdi Saibaba Sansthan Facebook)

साईबाबा जन्मस्थळाच्या वादात (Saibaba Birthplace Row) आता बीडकरांनीही (Beed) उडी घेतली आहे. साईबाबा बीडमध्ये नोकरी करत असल्याचा दावा बीडमधील साईभक्तांनी केला आहे. तसेच तीर्थक्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधीही साईभक्तांनी मागितला आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. त्यांनी बीडमध्ये नोकरी केली होती.

बीडचे साईभक्त पाटणकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, साईचरित्रामध्ये साईबाबा बीडमध्ये असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. माझे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते, असं सांगितलं होतं. साईबाबा चार ते पाच वर्ष बीडमध्ये कामानिमित्त वास्तव्यास होते. इंग्रजांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली होती, असेही पाटणकर यांनी सांगितले. (वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा)

बीडमधील किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबांचा जन्म पाथरीत झाला. ते अवलिया संत तसेच फकीर होते. साईबाबा कधीही एका जागेवर जास्त दिवस थांबत नव्हते. ते आपल्या गुरुसोबत बीडमध्ये आले होते. प्रसिद्ध दासगणू महाराजांच्या ग्रंथात साईबाबांचा उल्लेख आहे, असंही रामदासी यांनी सांगितलं.

मराठवाडा ही संतानी जन्मभूमी आहे, असंही यावेळी साईभक्तांनी सांगितलं. पाथरी ही साईबाबा यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या तीर्थक्षेत्रासाठी 100 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही बीडमधील साईभक्तांनी केली आहे.