अखेर साई (Sai Baba) जन्मभूमीचा शिगेला पोहचलेला वाद आता मिटला आहे. पाथरी गावाला साईंचे जन्मस्थान म्हणून संबोधण्याच्या निषेधार्थ, शिर्डीकरांनी (Shirdi) रविवारी 19 जानेवारीपासून शहर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिर्डीकरांचे 30 जणांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे.
श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे प्रतिनिधी आणि शिवसेना नेते कमलाकर कोठे (Kamlakar Kothe) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सीएम उद्धव ठाकरे यांच्या वक्त्यव्यानंतर शिर्डी गावातील लोकांनी साईबाबांचे मंदिर सोडून संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
Shri Saibaba Sansthan Trust delegation representative&Shiv Sena leader Kamlakar Kothe: Chief Minister Uddhav Thackeray has accepted our demands. People of Shirdi are satisfied with what he said. He has assured us that no new dispute will be created & we are ending the matter. https://t.co/CUaJkrjxEd pic.twitter.com/jLbHvEzWGV
— ANI (@ANI) January 20, 2020
कोठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. शिर्डीतील लोक त्यांच्या बोलण्याने समाधानी आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना आश्वासन दिले आहे की, यापुढे अजून कोणताही नवीन वाद निर्माण होणार नाही. त्यानुसार आता शिर्डीकरांनी हे प्रकरण संपवले आहे. पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे वक्तव्य मागे घेतले आहे. पाथरीचा विकास एक तीर्थक्षेत्र म्हणून करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, औरंगाबादमध्ये झालेल्या आपल्या सभेत पाथरी गावाचा उल्लेख केला होता. लोकांना संबोधताना त्यांनी, पाथरी गावात ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामे केली जातील आणि पाथरी गावात अनेक प्रकल्प राबविले जातील असे सांगितले होते. मात्र पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थळ नाही असे म्हणत शिर्डीकरांकडून नवीन वादाला तोंड फुटले. (हेही वाचा: साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद शिगेला; रविवारपासून शिर्डी शहर अनिश्चित काळासाठी बंद)
‘साईसतचरित्र’मध्ये कुठेही साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख नाही किंवा त्यांच्या जातीचाही उल्लेख नाही. मात्र पाथरी गावातील काही लोक साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नसतानाही, याबद्दल चुकीची महित्ती पसरवत आहे असे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिर्डीबंदचे आवाहन केले गेले होते.