Astik Kumar Pandey (Photo Credits: Facebook)

आजच्या काळात आपण कायदा हा सर्वांसाठी समान नसतो तर तो त्या व्यक्तीच्या हुद्द्यानुसार बदलतो असे बोलत आलो आहोत. मात्र बीडमध्ये (Beed) एका जिल्हाधिका-याने नागरिकांच्या या विचाराला फाटा देत जनतेसमोर एक कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. सामना ने दिलेल्या वृत्तानुसार, बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांनी स्वत:लाच 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक कप का वापरले जातात असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता एका पत्रकार परिषदेत सर्वांसमोर या जिल्हाधिका-यांनी स्वत:ला 5,000 रुपयांचा दंड केल्याचे जाहीर केले.

झाले असे की, निवडणूकांसंदर्भात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सर्व पत्रकार बांधवाना प्लास्टिक मिश्रीत कपातून चहा देण्यात आला. त्यावेळी निम्म्यापेक्षा अधिक पत्रकारांनी हा चहा घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका पत्रकाराने थेट पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांना विचारले की 'एका गरीब शेतकरी उमेदवाराने डिपॉझिटचे पैसे भरण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केला होता, त्यावेळी त्याने ती चिल्लर एका प्लास्टिक पिशवीत आणली होती. तेव्हा त्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता, मग आता जिल्हाधिकारी कार्यालयात प्लास्टिक मिश्रीत कप का वापरले जात आहेत?' या प्रश्नाने जिल्हाधिकारी गोंधळात पडले. त्यानंतर त्यांनी स्वत: पत्रकारांसमोर स्वत:लाच 5,000 रुपयांचा दंड ठोठावल्याचे जाहीर केले.  हेदेखील वाचा- Plastic Ban: प्लास्टिक वापरल्यास नागरिकांना 1 लाख रुपयांचा दंड

त्यांच्या या निर्णयाने सर्वांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. प्लास्टिक बंदी साठी एवढे कठोर कायदे केलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयातच प्लास्टिक मिश्रीत कपचा वापर केला जात असेल तर प्लास्टिक बंदी कशी होणार असा प्रश्नही उपस्थितांनी विचारला. जिल्हाधिका-यांच्या या निर्णयामुळे स्वत:वर दंडात्मक कारवाई केल्याची ही राज्यातील पहिली घटना असावी.

तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जात पत्रकार परिषदेत प्लास्टिक कप वापरण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सर्व कर्मचारी अधिका-यांची कानउघडणी केली.