बीड: बाभळीच्या काट्यावर झोपून भगवान महाराज यांनी दिला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना पाठिंबा
Indurikar Maharaj | Relationship | (Photo credit: archived, edited, symbolic images)

"सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होते," असे वक्तव्य आपल्या कीर्तन केल्याने निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj)  वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचा निशेध करत त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी वाढत असतानाच त्यांना पाठींबा देणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना पाठींबा देण्यासाठी बीड (Beed) येथील एक महाराज तर चक्क बाभळीच्या काट्यांवर झोपले आहेत. भगवान महाराज असे त्यांचे नाव आहे. ते तांदळवाडी येथील महादेव मंदिरात असतात. भगवान महाराज (Bhagwan Maharaj) यांनी बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरु केली असून, प्रशासनाला त्याची कल्पना नसल्याचे समजते.

भगवान महाराज हे आपल्या विविध कृतीमुळे अनेकदा चर्चेत असतात. या आधीही भगवान महाराज यांनी पाऊस पडे दे यासाठी स्वत:ला झाडावर टांगून घेत साधना केली होती. आता त्यांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून बाभळीच्या काट्यांवर झोपत साधना सुरु केली आहे. त्यांची ही साधाना परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच, बाभळीच्या काट्याचा त्यांना त्रास कसा होत नाही, याबाबतही उत्सुकता आहे. (हेही वाचा, इंदुरीकर महाराजांचा माफीनामा! वक्तव्याचा विपर्यास केला गेला म्हणत व्यक्त केली दिलगिरी)

कोण आहेत भगवान महाराज

भगवान महाराज हे मुळचे बीड जिल्ह्यातील लिंबारुई गावचे आहेत. त्यांनी बारा वर्षे याच गावात तप केल्याचे सांगितले जाते. तप पूर्ण झाल्यावर अलिकडेच ते तांदळवाडी येथील संगमेश्वर संस्थानात वास्तव्याला आले आहेत. निवृत्ती महाराज निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर होत असलेली टीका म्हणजे अध्यात्म धोक्यात आल्याचा प्रकार आहे. म्हणूनच भगवान महाराज यांनी कठोर साधना सुरु केल्याचे तिथले गावकरी प्रसारमाध्यमांना सांगतात.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी दिलगीरी व्यक्त करतो असे म्हटले आहे. इंदुरीकर यांनी माफी मागितली असली तरी, त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हाया अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, दिलगीरी नाट्यानंतर या प्रकरणावर पडदा पडणार की, हे प्रकरण वाढणार याबाबत उत्सुकता आहे.