बीड: शासकीय योजनांचा लाभ घेऊन अनुदान लाटण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोगस संस्थांविरुद्ध (Bogus Organizations) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात अस्तित्वात नसलेल्या दहा संस्थांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली होती. विभागाकडून मागच्या महिन्यात जेव्हा प्रत्यक्ष तपासणी झाली तेव्हा या संस्था बोगस असल्याची माहिती समोर आली होती. शासनाच्या ‘महास्वयं’ या वेब पोर्टलवर या दहा संस्थांची अधिकृत नोंदणी झाल्याची नोंद आहे. आता या संस्थांनी कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे, किती अनुदान मिळवले आहे आणि प्रक्रियेशिवाय या संस्थांची अधिकृत नोंदणी झालीच कशी याबाबत चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौशल्य विकास संस्था हे शासनाच्या विविध योजना राबवते. याबाबतीतल्या अनेक संस्था आणि केंद्रांचे ऑनलाईन पोर्टलद्वारे कामकाज चालते. यासाठी महास्वयं वेब पोर्टल कार्यरत आहे. या पोर्टलवर बीड जिल्ह्यातील दहा संस्थांनी एकाचवेळी नोंदणी केली होती. जेव्हा या संस्थांची प्रत्यक्ष तपासणी झाली तेव्हा या संस्था अस्तित्वातच नाहीत असे निदर्शनास आले. यावरून सरकारचे अनुदान लाटण्यासाठी या संस्था उभा केल्याचा संशय बळावला आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरु आहे.
या दहा संस्थांची नावे –
ग्लोबल अकॅडमी, विद्यासागर इन्स्टिट्यूट, गॅलेक्सी इन्स्टिट्यूट, अचिव्हर्स अकँडमी, ऍपेक्स इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी, सहयोग स्किल अकॅडमी, अभिनंदन कम्युटर्स, प्रतिभा ब्युटी पार्लर, यश स्किल सेंटर (हेही वाचा: महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचं नवं रॅकेट उघड! मागील 4 वर्ष सुमारे 57 जण करत आहेत 'डॉक्टर' म्हणून काम)
सरकारच्या कौशल्य विकास योजनांचा लाभ घेण्यासाठी संस्था या पोर्टलवर नोंदणी करतात. यावेळी त्या संस्थांबद्दल सर्व माहिती देणे गरजेचे असते. या संस्थांची खातरजमा झाल्यावर, इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 15 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र या संस्थांनी पूर्णतः चुकीची माहिती सरकारला दिली आणि असे पंधरा हजार लाटण्याचा प्रयत्न केला. तपासणीमध्ये रविवार, 4 नोव्हेंबर, 2018 रोजी या संस्थांना मान्यताप्राप्त म्हणून पोर्टलवर घेण्यात आले असल्याची बाबा उघड झाली आहे.