Thieve (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) येथे चोरांनी मुहूर्त पाहून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. येथे पाच दरोडेखोरांनी एका ज्योतिषाची मदत घेऊन चोरीसाठी शुभ मुहूर्त काढला व त्यानंतर एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता लुटली. याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी ज्योतिषासह पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सागर गोफणे नावाच्या व्यक्तीच्या घरी या दरोडेखोरांनी चोरी केली.

सागर शहराबाहेर गेले असता पाचही दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले व 95 लाखांची रोकड आणि 11 लाखांचे दागिने घेऊन फरार झाले. त्यावेळी गोफणे यांच्या पत्नी घरात होत्या मात्र त्यांना धाक दाखवून गप्प केले गेले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात सागर शिवाजी गोफणे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार तपास सुरु केला व आता पोलिसांनी सचिन अशोक जगधने, रायबा तानाजी चव्हाण, रविंद्र शिवाजी भोसले, दुर्योधन ऊर्फ दिपक ऊर्फ पप्पु धनाजी जाधव, नितीन अर्जुन मोरे यांना अटक केली आहे. या सर्व दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. तपासात त्यांनी एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून ही चोरी केल्याचे कबूल केले असून, यासाठी त्यांनी मुहूर्त काढला होता. रामचंद्र वामन चव्हाण असे ज्योतिषाचे नाव आहे. (हेही वाचा: Palghar Crime: संशयाचे भूत मुलाच्या डोक्यावर स्वार, कुऱ्हाडीचे घाव घालून केले जन्मदात्या आईला ठार)

पुणे ग्रामीणच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चोरांनी चोरी करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी रामचंद्र वामन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. चव्हाण यांनी काढून दिलेल्या मुहूर्तावर चोरांनी गोफणे यांच्या घरी चोरी केली. पोलिसांनी चव्हाण यालाही या गुन्ह्यात त्याच्या भूमिकेसाठी अटक केली आहे. आतापर्यंत चोरांकडून 76 लाख रुपये वसूल केले गेले आहेत. माहितीनुसार चोरांनी चोरी केल्यानंतर बालाजी, शिर्डी अशा ठिकाणी जाऊन देवदर्शन घेतले व दानधर्मही केला होता. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.