Lok Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना नाही जमलं ते अधिकाऱ्याच्या एका फोनने केलं; काय घडलं नेमकं? घ्या जाणून
Vijay Shivtare, Ajit Pawar, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती आणि घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन जोरदार जोर-बैठका सुरु आहेत. एका बाजूला या बैठका सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला बंडखोर आणि नाराजांची समजूत काढण्याची आणि त्यांची तलवार म्यान करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, काही ठिकाणी शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी एकत्रित प्रयत्न करुनही प्रयत्नांना यश येतनाही. अशा वेळी हाताखाली असलेल्या अधिकाऱ्यांना पुढे केले जात आहे. पुरंदर येथील शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याबाबत नेमके असेच घडले आहे. ज्यामुळे महायुतीचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचे मानले जात आहे.

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध उपसलेली बंडाची तलवार म्यान केल्याचे त्यांनी आज (३० मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगिले. त्यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विरोधात आपण भूमिका कायम ठेवणार होतो. त्यामुळे आपली समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न केले. पण, आपण बधलो नाही. त्यामुळे एकदा मुख्यमंत्री माझ्यावर चिडले सुद्धा. मात्र, एके दिवशी 27 मार्च रोजी आपल्याला मुख्यमत्र्यांचे ओएसडी असलेल्या खातगावकर नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी आपल्याला समजून सांगितले. त्यानंतर आपण आपला विचार बदलल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis and Ambadas Danve: अंबादास दानवे यांचा इशारा, देवेंद्र फडवीस यांच्याकडून खुलासा; प्रसारमाध्यमांची तारांबळ)

विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्याचे नाव घेऊन पत्रकार परिषदेत सांगितले की, या अधिकाऱ्याने आपल्याला फोन केला आणि सांगितले की, विजयबापू , तुमची भूमिका समजू शकते. परंतू, तुमच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांना अडचण होत आहे. परिणामी पक्षालाही अडचण होत आहे. तुम्ही सहकार्य केले नाही तर राज्यातील 15 ते 20 खासदार पडण्याची शक्यता आहे. इथपर्यंत हे प्रकरण जाऊ शकते, अशा वेळी आपण सहकार्य करायला हवे. हा फोन येताच काही क्षणामध्येच आपण आपला विचार बदलला. आपल्यामुळे पक्ष, संघटना धोक्यात येत असेल आणि असे काही घडत असेल तर त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे आपण विचार बदलला, असे शिवतारे म्हणाले. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपले फोनवर बोलणे करुन दिले. मुख्यमंत्र्यांनी आपण निर्णय बदलला याबद्दल आपले कौतुक केले, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Dr. Archana Patil Chakurkar: शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना यांचा भाजपमध्ये प्रवेश, लातूल जिल्हातील राजकीय समिकरणे बदलणार)

दरम्यान, पुरंदरच्या विकासासाठी संपूर्ण योगदान देण्याचा शब्द आपल्याला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही शिवतारे यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सध्यातरी मिटल्याचे बोलले जात आहे. पण राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जमले नाही, ते एका अधिकाऱ्याच्या फोनने झाले.